citynewsInternational NewsLatest News

इंडोनेशियात हेलिकॉप्टर दुर्घटना; २४ तास बेपत्ता राहिल्यानंतर जंगलात कोसळले, ८ जणांचा मृत्यू

जकार्ता | वृत्तसंस्था
इंडोनेशियातील बोर्निओ बेटावर मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली असून, २४ तास बेपत्ता राहिल्यानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष जंगलात सापडले आहेत. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशियाच्या पश्चिम कालिमंतान प्रांतातील मेलावी जिल्ह्यातून हे हेलिकॉप्टर गुरुवारी सकाळी उड्डाण घेतले होते. पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा कंपनीचे हे एअरबस H130 हेलिकॉप्टर पाम तेलाच्या मळ्यांदरम्यान प्रवास करत होते. उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला.

रडार संपर्क तुटल्यानंतर प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. तब्बल २४ तासांच्या शोधानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष सेकाडाऊ जिल्ह्यातील दाट जंगलात सापडले. हेलिकॉप्टर पूर्णपणे तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले.

या दुर्घटनेत दोन वैमानिक आणि सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मलेशियन नागरिकाचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इंडोनेशियाच्या बचाव पथकाने सांगितले की, हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले ते क्षेत्र अतिशय दाट जंगल आणि डोंगराळ असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणी येत आहेत. सैन्य, पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचून मृतदेह आणि अवशेष बाहेर काढण्याचे काम करत आहेत.

सीएनएन इंडोनेशियाच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज असतानाच त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वैमानिकांनी ते हवेत ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटांतच हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला आणि त्यानंतर ते कोसळले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button