BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मेहकर उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला

बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक कैलास मुरकुट याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या पक्षकाराच्या जमिनीच्या फेरफार रद्द करण्यासंदर्भातील अपीलावर २३ फेब्रुवारी रोजी अंतिम आदेश झाला होता. मात्र, त्या आदेशाची मूळ प्रत आरोपी कैलास मुरकुट यांच्या ताब्यात होती. तक्रारदाराने ही प्रत मागितल्यानंतर आरोपीने ती देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

यानंतर संबंधित वकिलाने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार १६ एप्रिल २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कक्षात कैलास मुरकुट याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सरकारी कार्यालयांमध्ये अजूनही लाचलुचपत सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. एसीबीकडून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने होत असल्या, तरीही प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारीवर या घटनांमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button