परतवाडा-अचलपूर व्हिडिओ प्रकरणाने राज्य हादरले; आरोपी अयान अहमदवर POCSO अंतर्गत गुन्हा, चित्रा वाघ यांचा संताप

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर परिसरात घडलेल्या कथित व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याविरोधात आता POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.
या घटनेवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मुलींना फसवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका स्पष्ट आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.”
चित्रा वाघ यांनी या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ आणि कठोर पावले उचलल्याचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, आरोपींवर केवळ गुन्हा दाखल करून थांबायचे नाही, तर त्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री शासन करणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचा संदेश त्यांनी दिला.
या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी मुलींना आणि त्यांच्या पालकांनाही महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, सोशल मीडिया, मोबाईल आणि ऑनलाईन मैत्रीच्या माध्यमातून अनेकदा मुलींना जाळ्यात ओढले जाते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये. स्वतःची वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ कोणालाही पाठवू नयेत. कुणी दबाव आणत असेल, धमकी देत असेल किंवा चुकीची मागणी करत असेल तर तात्काळ कुटुंबीय आणि पोलिसांना माहिती द्यावी.
चित्रा वाघ म्हणाल्या, “मुलींनो, कोणाच्याही जाळ्यात फसू नका. आपल्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहणे ही काळाची गरज आहे.”
पालकांनाही त्यांनी महत्त्वाचा संदेश दिला. “आजच्या काळात मुलांशी संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मुलं काय पाहतात, कुणाशी बोलतात, सोशल मीडियावर कोणाशी संपर्कात आहेत याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांना घाबरवण्याऐवजी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा. अनेकदा भीतीमुळे मुलं अशा घटना लपवतात आणि परिस्थिती आणखी गंभीर होते,” असे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नैतिक शिक्षणासोबतच डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन देण्याची गरजही चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर गुन्हे, ब्लॅकमेलिंगपासून बचाव आणि ऑनलाईन फसवणूक याबाबत लहान वयापासून शिक्षण दिले गेले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट, कॉल रेकॉर्ड आणि संपर्कांची तपासणी सुरू ठेवली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परतवाडा-अचलपूरमधील या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.



