परतवाड्यात व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखी दोन आरोपी ताब्यात; अयानच्या घरावर बुलडोझर कारवाई

परतवाडा शहरातील गाजत असलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी आणखी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे.
या प्रकरणात यापूर्वी अयान अहमद आणि उजेर खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सहाद आणि तबरेज या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद स्वतः या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असून, तपासाची सूत्रे त्यांच्या देखरेखीखाली आहेत.
पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन अधिक तीव्र केले आहे. सर्व आरोपींचे मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया संपर्क आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आणखी काही आरोपींनाही अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावर नगर परिषद प्रशासनानेही मोठी कारवाई केली आहे. परतवाड्यातील त्याच्या घरावर बुलडोझर चालवत अवैध बांधकाम हटविण्यात आले. विशेषतः घरासमोरील आणि वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या अवैध पायऱ्या तोडण्यात आल्या.
नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. अतिक्रमण आणि अवैध बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेत आरोपीवरचा प्रशासकीय फास आणखी आवळण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे परतवाडा शहरात संतापाचे वातावरण असून, नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.



