रामटेक गडमंदिर परिसरात संशयास्पद हंडा सापडला; खजिना की इतिहासाचा ठेवा?

रामटेक (नागपूर) : जिल्ह्यातील रामटेक येथील गडमंदिर परिसरात खोदकामादरम्यान जमिनीतून एक संशयास्पद हंडा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वराह मंदिराजवळ सुरू असलेल्या खोदकामाच्या वेळी मजुरांना जमिनीत खोलवर एक मोठा हंडा आढळून आला. ही बाब लक्षात येताच ठेकेदार आणि मजुरांनी तो हंडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या हंड्यात नेमके काय आहे, त्यात काही मौल्यवान वस्तू किंवा ऐतिहासिक अवशेष आहेत का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा हंडा खजिन्याचा भाग आहे की एखाद्या ऐतिहासिक वारशाचा ठेवा, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, काही नागरिक हा खजिना असू शकतो असा अंदाज व्यक्त करत आहेत, तर काही जण यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी असण्याची शक्यता मांडत आहेत.
दरम्यान, या ठिकाणी आणखी पुरातन वस्तू दडलेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुरातत्त्व विभागाने तात्काळ सखोल तपास करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सध्या गडमंदिर परिसरात सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले असून, या हंड्यामागील रहस्य काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.



