मनसरमध्ये खळबळ! मंदिराच्या तलावात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह; नेमकं कारण अद्याप गूढ

रामटेक (नागपूर) : तालुक्यातील मनसर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, श्रीकृष्ण मंदिराजवळील तलावात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव तरुण कश्यप असे असून तो मनसर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री तो अचानक घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
शोधादरम्यान तलावाच्या काठावर त्याची दुचाकी, मोबाईल आणि चप्पल आढळून आल्याने संशय अधिकच वाढला. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली.
अखेर सायंकाळी सुमारे ५ वाजता तलावातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार आत्महत्या आहे, अपघात आहे की काही संशयास्पद बाब आहे, याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे मनसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणामागील सत्य पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.



