बेकायदेशीर शाळांमध्ये 450 विद्यार्थ्यांची फसवणूक

नागपूरच्या टेक्का परिसरात चालणाऱ्या गौसिया स्कूल आणि जुबैदा स्कूल या दोन शाळांबाबत मोठा घोटाळा उघड झाला आहे. शिक्षण विभागाच्या तपासात या दोन्ही शाळांना कोणतीही शासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची सुरुवात एका शिक्षकाच्या तक्रारीने झाली. नोकरी पक्की करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून सुमारे १७ लाख रुपये उकळण्यात आले, मात्र त्यांना नोकरी देण्यात आली नाही. तपास जसजसा पुढे गेला, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले— सुमारे ४० पेक्षा अधिक शिक्षकांकडून २० ते ३० लाख रुपये उकळण्यात आले होते. या शाळांमध्ये पहिली ते नववीपर्यंत सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थी शिक्षण घेत होते.
मात्र, या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टीसी आणि शैक्षणिक कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा शाळा सुरू अवस्थेत होत्या आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या शाळांना कोणतीही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
त्यांच्या मिलीभगतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ शकत नाही, असा आरोप केला जात आहे. याशिवाय, संबंधित संस्थेकडून माइनॉरिटी स्टेटसचा गैरवापर केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या माध्यमातून नियमांना बगल देत शिक्षक भरती आणि आर्थिक व्यवहार करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. आता प्रशासन या फर्जी शाळांवर काय कारवाई करते आणि विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



