शेतकरी कुटुंबातील मुलीची भरारी; शिरजगावच्या सीमा गोरेची पोलीस दलात निवड

कन्नड : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील शिरजगाव येथील सीमा दिलीप गोरे हिने घालून दिले आहे. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या सीमाने मेहनतीच्या बळावर थेट पोलीस दलात स्थान मिळवले आहे.
शिरजगाव हे कन्नड तालुक्यातील शेतकरीबहुल गाव असून याच गावातील सीमा गोरे हिने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नागपूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस पदावर निवड मिळवली आहे. सीमाचे आई-वडील शेतीकाम आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही.
सीमाने बारावीपर्यंतचे शिक्षण कन्नड येथील चपावती कन्या विद्यालयात पूर्ण केले. लहानपणापासून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सीमाने ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. अनेक अडचणींवर मात करत तिने आपले लक्ष करिअरकडे केंद्रित ठेवले आणि अखेर तिच्या मेहनतीचे चीज झाले.
सीमाच्या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबीयांचे सहकार्य आणि स्वतःची जिद्द यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या या यशामुळे शिरजगावसह परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सीमा गोरेची ही यशोगाथा ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर यश निश्चित मिळते,” हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.



