साताऱ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट; अहमदनगरमध्ये प्लास्टिक कारखान्याला आग, राज्यात खळबळ

सातारा जिल्ह्यातील कराडजवळ तासवडे एमआयडीसी परिसरात आज भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका केमिकल कंपनीत झालेल्या या स्फोटाचा आवाज तब्बल १० किलोमीटरपर्यंत ऐकू आला असून, अनेक ठिकाणी इमारतींच्या काचा फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, नागरिकांनी सुरुवातीला भूकंप झाल्याची भीती व्यक्त केली.
स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली असून, आकाशात उंच उसळणारे धुराचे लोट दूरवरूनही दिसत आहेत. परिसरात ज्वलनशील रसायनांचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतही आज भीषण आग लागल्याची घटना घडली. ‘व्यंकटेश पॉली’ या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत अचानक आग भडकली. प्लास्टिकचा मोठा साठा असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात दाट धुराचे लोट पसरले.
अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीतील मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दोन्ही घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



