भंडाऱ्यात काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

भंडारा : राज्याच्या राजकीय वर्तुळाला सोमवारी (३० मार्च २०२६) सकाळी धक्का देणारी घटना घडली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार पडोळे हे काही निवडक सहकाऱ्यांसह भंडाऱ्यातून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते विमानाने जाणार होते. मात्र, वाटेतच ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली.
या भीषण अपघातात फॉर्च्युनर कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार प्रशांत पडोळे यांना किरकोळ दुखापत झाली असून, वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.



