पुसदच्या सुपुत्राचा नाशिकमध्ये गौरव; राजेश ढोले यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार’

नाशिक : पुसद येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश ढोले यांचा नाशिकच्या ऐतिहासिक नगरीत सन्मान करण्यात आला आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नाशिकमधील गंजमाळ परिसरातील रोटरी हॉल येथे ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत राजेश ढोले यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ढोले यांच्या पत्रकारितेतील आणि सामाजिक कार्यातील योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.
राजेश ढोले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दलित, वंचित, श्रमिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे पुसद शहराच्या मानात भर पडली असून, सर्व स्तरांतून राजेश ढोले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



