रामटेकमध्ये विहिरीत उडी घेऊन 50 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; टिळक वॉर्डमध्ये खळबळ

रामटेक : शहरातील टिळक वॉर्ड परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव टिकाराम उर्फ गणेश सीताराम रहाटे (वय 50) असे असून त्यांनी बसस्टॉपच्या मागील बाजूस असलेल्या गहू तलावाजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, घटना घडली त्या वेळी मृताची पत्नी काचूरवाही येथे एका लग्नसमारंभासाठी गेली होती. दरम्यान, स्थानिक नागरिकांना विहिरीत मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तातडीने रामटेक पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रामटेक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे रामटेक शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणामागील नेमके कारण काय हे तपासातून लवकरच समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



