परभणी-हिंगोली मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक्टर पलटी होऊन २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

परभणी-हिंगोली मुख्य रस्त्यावर हट्टा बस स्थानकाजवळ मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात संकेत पिराजी खिल्लारे (वय २२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २८ मार्च रोजी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास घडली असून, परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत खिल्लारे हा आपल्या ट्रॅक्टरने हट्टा बस स्थानकाकडून नवीन प्लॉटिंग भागाकडे जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्यावरून खाली उतरताना ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यातील जड टायर त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरने रस्त्याकडेला असलेला विद्युत खांबही उध्वस्त केला. त्यामुळे आडगाव फीडरचा वीजपुरवठा खंडित झाला असून, दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य कायम होते.
घटनेची माहिती मिळताच एपीआय संग्राम जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. हट्टा परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त ट्रॅक्टरला नंबर प्लेट नसल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी संकेत खिल्लारे याचे पार्थिव हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेची अद्याप अधिकृत नोंद झाली नसली, तरी पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



