बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाचा मोठा दणका: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा

बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कडक कारवाई सुरू केली असून, चिखली येथील एका पेट्रोल पंप मालकाविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील इंधन विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरक्षित आणि सुरळीत राहावा, यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या टाकीतच भरणे बंधनकारक आहे. मात्र, चिखली शहरातील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले.
२६ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान संबंधित पेट्रोल पंपावर कॅन, बाटल्या आणि खुल्या कंटेनरमध्ये बेकायदेशीररित्या इंधन विक्री केली जात असल्याचे आढळून आले. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, यामुळे आग किंवा स्फोटासारख्या गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या प्रकरणी चिखली तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप मालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२३ आणि २८७ प्रमाणे फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास चाटारकर करत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना इंधन साठवण्याच्या घाईत न पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
चिखलीतील ही कारवाई इतर पेट्रोल पंपांसाठी इशारा मानली जात असून, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



