पुसदमध्ये अवैध रेती माफियांवर धडक कारवाई; ३० लाखांचा साठा जप्त, ४०० ब्रास रेती सील

यवतमाळ (प्रतिनिधी):
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात अवैध रेती साठवणुकीवर पोलिस आणि तहसील प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुसद शहरातील डोंगरे लेआऊट परिसरात तसेच सहारा पार्क भागातील खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर अवैध रेती साठवून ठेवण्यात आली होती. अब्दुल राजिक अब्दुल रऊफ या कंत्राटदाराच्या नावावर हा साठा असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर तहसील आणि पोलिस पथकाने संयुक्तरित्या छापेमारी करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली.
या कारवाईदरम्यान सुमारे ४०० ब्रास अवैध रेतीचा पंचनामा करण्यात आला असून संपूर्ण साठा सील करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या रेतीच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
ही कारवाई नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर मस्के आणि पुसद पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.
दरम्यान, या धडक कारवाईमुळे पुसद परिसरातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अशा कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अवैध रेती माफियांवर प्रशासनाने मोठा प्रहार केला असला तरी, अशा कारवाया सातत्याने होणार का, की पुन्हा अवैध धंदा सुरू होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



