वाकोडी शिवारात भीषण अपघात; भरधाव कार खांबावर आदळली, एक जखमी नागपूरला हलवला

नागपूर (प्रतिनिधी):
वाकोडी शिवारातील दोहनघाट रोडवर भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याला तातडीने नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 31 FE 5774 क्रमांकाची कार अचानक नियंत्रण सुटल्याने खांबावर जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी व्यक्तीला वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले.
जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
ही घटना खापा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुदैवाने स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत मदत मिळाली, मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



