ई-गव्हर्नन्समध्ये अमरावती महानगरपालिकेचा डंका; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई/अमरावती (प्रतिनिधी):
अमरावती महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित राज्यस्तरीय समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या कामगिरीची दखल घेण्यात आली. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये अमरावतीने २०० पैकी तब्बल १७९.५० गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
विशेष म्हणजे, विदर्भ आणि मराठवाडा विभागातून या यादीत स्थान मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा उत्कृष्ट नमुना उभा करण्यात आला आहे.
मर्यादित संसाधनांमध्येही मोठ्या शहरांशी स्पर्धा करत मिळवलेले हे यश विशेष मानले जात आहे. महानगरपालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये “माय अमरावती” व्हॉट्सअॅप चॅटबॉट, मोबाईल अॅप, डिजिटल संवाद प्रणाली, रिमोट सेन्सिंगवर आधारित कूल रूफ उपनियम २०२५, शासकीय प्रक्रियांचे डिजिटायझेशन, नवीन वेब पोर्टल्स, ब्लॉकचेनद्वारे प्रमाणपत्र पडताळणी तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश आहे.
या कामगिरीमुळे अमरावती महानगरपालिका राज्यातील स्मार्ट आणि प्रभावी प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, भविष्यातील स्मार्ट सिटी मॉडेलसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.



