Accident NewsLatest NewsSolapur

हैदराबाद–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

हैदराबाद–सोलापूर महामार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील बोरामणी नाका येथे एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक वेगाने जात असताना त्याने दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले आणि ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. या अपघातात सैफन शेख आणि फरीद पटेल या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हे दोघेही दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे रहिवासी असून, व्यवसायाने आचारी होते. कामाच्या निमित्ताने ते सोलापूर शहरात आले होते. मात्र, परतीच्या प्रवासात नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दरम्यान, ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघाताचे भीषण स्वरूप त्यातून स्पष्ट दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button