रावेर तालुक्यात अवैध डिंक संकलनावर वन विभागाची धडक कारवाई; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रावेर :
तालुक्यातील पाल वनक्षेत्रात वन विभागाने अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई करत सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गारबर्डी परिमंडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे २५ मार्च २०२६ रोजी वन विभागाने धडक कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मध्यप्रदेशातील मेंढागड आणि मांडवखेडा येथील चार जणांचा समावेश आहे. पुढील तपासादरम्यान वन विभागाने पाल परिसरातील अवैध गोदामांवर धाडी टाकल्या. या धाडीत धावडा, सलाई आणि कड या प्रजातींचा तब्बल ७,५०० किलो डिंक जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच कारवाईदरम्यान एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली.
वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध डिंक संकलन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
वनसंपत्तीची लूट थांबवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



