जालना जिल्ह्यात इंधन टंचाई तीव्र; पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी, नागरिक संतप्त

जालना :
जिल्ह्यात सध्या पेट्रोल-डिझेल टंचाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून अनेक पेट्रोल पंप बंद आहेत, तर सुरू असलेल्या पंपांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र दिसत आहे.
इंधनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर धावडा येथील अनवेकर पेट्रोल पंपावर नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून काहींना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
इंधन टंचाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकरी, व्यापारी आणि रोजंदारी कामगारांनाही बसत आहे. वाहतूक व्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. काहींनी तर “परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन छेडू” असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. इंधन टंचाईमुळे निर्माण झालेली ही स्थिती प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून आता प्रशासन किती लवकर ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



