वाघोड गावात रामनवमी उत्साहात; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात श्री राम जन्मोत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण गाव ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील माजी सरपंच लक्ष्मीकांत महाजन यांच्या निवासस्थानाजवळ पारंपरिक पद्धतीने दुपारी बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी भगवान श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सत्यनारायणाची पूजा आणि आरती भक्तिभावाने पार पडली. या धार्मिक विधीचे पुरोहितपद रघुनंदन शर्मा यांनी पार पाडले.
रामजन्माच्या क्षणी संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या सोहळ्यास मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
एकूणच, वाघोड गावातील हा श्री राम जन्मोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मतेचेही प्रतीक ठरत असल्याचे दिसून आले.



