मुंडवाडीत श्रीराम साप्ताह उत्साहात संपन्न; हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी जल्लोषात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथे श्रीराम प्रभू साप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम नवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
मुंडवाडी येथील श्रीराम मंदिर परिसर “सीता रामचंद्र की जय”, “प्रभू रामचंद्र की जय” आणि “बोल बजरंग बली की जय” अशा जयघोषांनी दुमदुमून गेला होता. शेकडो दिवट्यांच्या प्रकाशात गुलालाची उधळण आणि पुष्पवर्षाव करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
गुरुवारी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. मंदिर परिसर फुलांनी आणि रंगांनी सजला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. युवक-युवतींच्या झुंडी रामनामाच्या जयघोषात रंगून गेल्या होत्या.
हा उत्सव केवळ रामनवमीपुरता मर्यादित नसून गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा साप्ताहिक सोहळा तब्बल आठ ते दहा दिवस चालतो. या काळात दररोज पहाटे काकड आरती, पूजा, रामनाम जप, गीतापाठ, भजन आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
तसेच मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत विविध देवतांच्या आरत्या करण्यात आल्या. श्रीरामास अभ्यंगस्नान घालून विधीवत पूजा करण्यात आली. राम जन्मानंतर पाळणा सोहळा आणि कीर्तन पार पडले. यानंतर भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.
एकूणच, मुंडवाडी येथील श्रीराम साप्ताह हा भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा सुंदर संगम ठरला असून, मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात हा सोहळा संपन्न झाला.



