बडनेऱ्यात वीज वितरण कंपनीवर गंभीर आरोप; महिला कर्मचाऱ्याच्या वर्तनामुळे नागरिक संतप्त

बडनेरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) च्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकांशी उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विज बिल वसुली पथकासोबत फिरणारी ही महिला कर्मचारी ग्राहकांशी गैरवर्तन करत असून, प्रश्न विचारणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. “सेवा देण्याऐवजी आम्हाला अपमान सहन करावा लागतो,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
यासोबतच मार्च एंडिंगच्या नावाखाली गरीब ग्राहकांना कोणतीही मुदत न देता थेट वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे. दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्राहकांना सवलत दिली जात असल्याची चर्चा असून, यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी वीज वितरण विभागाचे सहायक अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत अनभिज्ञता दर्शवली. “अशी कोणतीही तक्रार माझ्या निदर्शनास आलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तीव्र झाला आहे. संतप्त नागरिकांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली असून, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, संबंधितांवर कारवाई होणार का आणि नागरिकांना न्याय मिळणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



