Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsFestival NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ईद-उल-फित्र उत्साहात; नमाज, शुभेच्छा आणि एकतेचा संदेश

अमरावती, प्रतिनिधी :
३० दिवसांच्या इबादत, आत्मसंयम आणि धैर्यानंतर आज ईद-उल-फित्रचा पवित्र सण अमरावती शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात ईदची विशेष रौनक पाहायला मिळाली. ईदगाह मैदानापासून ते गल्लीबोळांपर्यंत आनंदाचे वातावरण पसरले होते.

अमरावतीच्या मुख्य ईदगाह मैदानावर आज सकाळचे दृश्य अत्यंत विलोभनीय होते. हजारो मुस्लिम बांधवांनी एकाच रांगेत उभे राहून नमाज अदा केली आणि देशात सुख-शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. रमजान महिन्यातील शिस्त आणि संयमाचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.

ईदच्या निमित्ताने शहरातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीही उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी गणेश, शिंदे शाम घुगे, थानेदार उरलागोंडावार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सुरक्षेची पाहणी केली.

पोलीस आयुक्तालयामार्फत आयोजित कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, भैया पवार, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, पार्षद बबलू शेखावत यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग घेत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

पठाण चौकात आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके, मनपा सभापती अविनाश मार्डीकर तसेच माजी महापौर ॲड. किशोर शेलके यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. इतवारा बाजार आणि गवळीपुरा मशीद परिसरातही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

नवीन कपडे परिधान केलेली लहान मुले ‘ईदी’साठी उत्सुक दिसत होती, तर घराघरांत बनवण्यात आलेल्या शेवयांची खीर, शीरखुर्मा यांसारख्या पदार्थांनी सणाचा गोडवा अधिक वाढवला.

ईद-उल-फित्रचा हा सण धर्म, जात-पात यापलीकडे जाऊन माणुसकी आणि प्रेमाचा संदेश देतो. अमरावती पोलिसांची सतर्कता आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा सण शांततेत आणि उत्साहात पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button