Education NewsIndia NewsLatest News

नवी मुंबई महापालिका शाळांचा ‘मेकओव्हर’ की मराठीवर आघात? इंग्रजी माध्यमाचा प्रस्ताव चर्चेत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेबाबत एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त ठरू शकणारा प्रस्ताव समोर आला आहे. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रस्ताव लवकरच महासभेत मांडला जाणार असून, सभागृह नेते सागर नाईक यांच्याकडून तो सादर केला जाणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, चालू शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे. शहरातील मोठ्या संख्येने असलेल्या मराठी शाळांना इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याची योजना आखली जात आहे.

या निर्णयामागील उद्देश स्पष्ट करताना सागर नाईक यांनी सांगितले की, “गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी हा प्रस्ताव मांडला जात आहे. जे या निर्णयाला विरोध करत आहेत त्यांनी प्रथम आपल्या मुलांचे शिक्षण कोणत्या माध्यमात सुरू आहे, हे पाहावे.”

दरम्यान, मराठी भाषा आणि शिक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात संवेदनशील मानला जात असल्याने या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महासभेत प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधकांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात हा मुद्दा येत्या काही दिवसांत चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button