Crime NewsLatest NewsPune

पुण्यात धक्कादायक घटना!, कबुतर चोरीच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे. क्षुल्लक कारणावरून हल्ले आणि प्रेमसंबंधातून होणाऱ्या हत्या प्रकरणांनंतर आता चोरीच्या संशयातून एका निष्पाप तरुणाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश धनराज शिंदे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यासोबत त्याचा मित्र अजय गणेश टिंगरे (वय २०) होता. १८ मार्चच्या पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दोघे दुचाकीवरून मोशीकडे जात होते.

दरम्यान, हडपसर येथील शंकरमठाजवळ ते काही वेळ थांबले. त्यानंतर पवार एन्क्लेव्ह परिसरातील कॅनाललगत असलेल्या मोकळ्या जागेत कबुतरांच्या पिंजऱ्याजवळ ते गेले.

याच वेळी श्वान भुंकल्याने दोघेही तेथून पळू लागले. मात्र, स्थानिक पाच जणांनी त्यांच्यावर चोरीचा संशय घेत पाठलाग केला. मुख्य रस्त्यावर असलेल्या जिनमाता मोटर्ससमोर रूपेश पळताना खाली पडला.

यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच बॅटने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत रूपेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रूपेशचे वडील धनराज बळिराम शिंदे यांनी तक्रार दाखल केली असून, वानवडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

⚠️ प्रश्न निर्माण करणारी घटना

ही घटना पुन्हा एकदा समाजातील वाढत्या आक्रमकतेकडे आणि कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. चोरीचा केवळ संशय असताना थेट मारहाण करून जीव घेणे, ही चिंताजनक बाब आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button