रामटेकमध्ये गॅस आणि पेट्रोलची तीव्र टंचाई; नागरिक पहाटेपासून रांगेत

नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या तीव्र तुटवड्यामुळे नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
रामटेक परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी “नो स्टॉक”चे फलक लावण्यात आले आहेत. उर्वरित पंपांवर वाहनधारकांची प्रचंड गर्दी होत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे.
दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक जणांना रात्री २ वाजल्यापासून गॅस एजन्सीसमोर रांगेत उभं राहावं लागत आहे. तरीही चार-चार दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी गॅस सिलेंडरचे वितरण पोलीस बंदोबस्तात करण्यात येत आहे. दरम्यान, खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याने ही टंचाई निर्माण झाल्याची चर्चा आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रामटेकमध्ये गॅस आणि पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.
या समस्येकडे राज्य सरकार आणि संबंधित विभाग कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



