Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेड जिल्ह्यात भरधाव ट्रकची धडक; तीन गायी ठार, एक गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेगाच्या बेफाम धडकेत तीन निष्पाप गायींचा जागीच मृत्यू झाला असून, एक गाय गंभीर जखमी झाली आहे.


ही घटना लखमापूर तांडा, माहूर परिसरात घडली. पंचशील विद्यालयासमोरील धोकादायक वळणावर केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या भरधाव ट्रकने चार गायींना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की तीन गायींचा जागीच मृत्यू झाला, तर एक गाय गंभीर जखमी अवस्थेत तडफडत पडली होती. या गायी लखमापूर येथील शेतकरी संजय कुंदन जाधव यांच्या मालकीच्या असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायी रस्त्याच्या कडेला गावाकडे जात असताना TG01 1242 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही अज्ञात व्यक्तींनी ट्रकवर दगडफेक करत काच फोडल्याची माहितीही समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, माहूर-सारखणी राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांमुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. जखमी गाईवर स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टर तुषार डोंगरे यांनी उपचार केले असून, पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे.


वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या धोकादायक वळणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button