अमरावतीत हॉर्नवरून वाद; तरुणावर जीवघेणा हल्ला, ४-५ जणांची बेदम मारहाण

अमरावती शहरात किरकोळ कारणावरून मोठ्या हिंसाचाराची घटना समोर आली आहे. समर्थ स्कूल परिसरात ‘आउटलुक सलून’ समोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून हा वाद चिघळल्याची माहिती समोर येत आहे.
सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अमरावतीच्या समर्थ स्कूल परिसरात अचानक गोंधळ उडाला. रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून कपिल अग्रवाल यांचा काही व्यक्तींशी वाद झाला.
वाद मिटवण्यासाठी कपिल अग्रवाल हे ‘आउटलुक सलून’मध्ये गेले असता, तिथे उपस्थित असलेल्या ४ ते ५ जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत कपिल अग्रवाल गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ कौशिक अग्रवाल आणि संगम गुप्ता यांच्यासह अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले, त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, माहिती मिळताच राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
या घटनेनंतर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून, आरोपींवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.



