मुंबईत ACB ची मोठी कारवाई! खार पोलीस ठाण्याचा API पोलीस अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सातत्याने धाडी टाकत कारवाईचा धडाका सुरूच आहे. महसूल, प्रशासन आणि पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई येथे आणखी एक धक्कादायक कारवाई समोर आली आहे.
खार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक (API) तुषार काळे यांना ACB ने लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा पोलीस खात्यातील भ्रष्टाचार उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे यांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून दीड लाख रुपये स्वीकारताना ACB च्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडले.
सदर प्रकरण वांद्रे न्यायालय येथे प्रलंबित होते. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी तुषार काळे यांच्याकडे होती. मात्र, चौकशी अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत ACB कडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपी अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.
दरम्यान, या कारवाईमुळे पोलीस विभागातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ACB कडून पुढील तपास सुरू आहे.



