लंडनमध्ये भीषण अपघातात गायक मनजीत सिंह जखमी; रुग्णालयात दाखल, मुंबई दौरा रद्द

मुंबई : ‘मंज म्युझिक’ या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक Manj Musik उर्फ मनजीत सिंह राल लंडनमध्ये भीषण अपघातात जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे त्यांचा नियोजित मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अपघातानंतर मनजीत सिंह यांना लंडनमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना नेमकी कुठे दुखापत झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या अपघातामुळे त्यांचा मुंबई प्रवास रद्द करण्यात आला आहे.
‘स्वॅग मेरा देसी’ आणि ‘लाल घाघरा’ यांसारखी हिट गाणी देणारे मनजीत सिंह हे ‘झी सिने अवॉर्ड्स 2026’ मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स देणार होते. मात्र अपघातामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रॅडफर्ड येथे जन्मलेल्या मनजीत सिंह राल यांनी आपल्या भावांसह RDB (रिदम, ढोल, बेस) या बँडची स्थापना केली होती. त्यांनी कुलदीप राल (कुली) आणि सुरजीत सिंह यांच्यासोबत संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ते गुरुद्वारांमध्ये परफॉर्म करत असत. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा संगम साधत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि प्रवासी संगीताला नवे परिमाण दिले.



