Latest NewsMaharashtraNagpur

चाणक्यपुरम-नरसाळा परिसरात भीषण आग; शेकडो प्लास्टिक पाईप जळून खाक, मोठी दुर्घटना टळली

नागपूर : नागपूर शहरातील चाणक्यपुरम, नरसाळा परिसरात रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ साठवून ठेवलेले गडरलाईनचे शेकडो प्लास्टिक पाईप आगीत जळून खाक झाले. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

रविवारी सकाळी चाणक्यपुरम येथील नरसाळा भागातील मोकळ्या जागेत अचानक आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात गडरलाईनसाठी वापरले जाणारे प्लास्टिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते. काही क्षणांतच आगीने या पाईपच्या साठ्याला वेढा घातला आणि शेकडो पाईप जळून खाक झाले.

घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक जितेंद्र मुळे यांनी तातडीने नागपूर महानगरपालिका अग्निशमन दल यांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

परिसरात निवासी घरे असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

प्राथमिक अंदाजानुसार, मोकळ्या जागेत कचरा जाळण्यात आल्यामुळे आग पसरून पाईपच्या साठ्यापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मोकळ्या जागेत कचरा जाळण्याच्या प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button