अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; आज एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

अमरावती
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा आज अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी १ वाजताच्या सुमारास या सभेला सुरुवात होणार असून शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेत मंत्री संजय राठोड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी खासदार आनंदराव अडसूळ तसेच प्रीती बड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्यासाठी शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नेहरू मैदान परिसरात सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून या सभेतून अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनिती आणि पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



