नागपूर : कपिल नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर
नागपूर शहरातील कपिल नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. कपिल नगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ४ जानेवारी २०२५ रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कपिल नगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने रमाई नगर, प्लॉट क्रमांक ५० समोर रेड कारवाई केली. या कारवाईत रामचंद्र मिठाईलाल शाहू (वय ५२), रा. रमाई नगर, कपिल नगर, नागपूर याला शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा बाळगताना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपीकडून MONOFIL GOLD या नावाचा नायलॉन मांजा असलेले २० चक्री/कोन, प्रत्येकी २ हजार रुपये किमतीचे, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर नायलॉन मांजा मानव, पक्षी तसेच पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याने शासनाने त्यावर बंदी घातली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कपिल नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.



