Latest NewsNandedSocial News

नांदेड : माळाकोळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती भवन व पुतळ्याचे अनावरण, पंकजा मुंडे भावूक

नांदेड

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी गावात आज एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती भवनासह भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

माळाकोळी येथे उभारण्यात आलेल्या स्मृती भवन आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप दिले.

पुतळा अनावरणाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगत गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य जनतेसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. यावेळी भावना अनावर झाल्याने त्या भावूक झालेल्या दिसून आल्या.

यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,
“मी असो किंवा नसो, पण गोपीनाथ मुंडे यांचं नाव जग कधीच विसरणार नाही. जगाला त्यांचं कार्य आणि नाव विसरू देणार नाही, ही माझी शपथ आहे.”

कार्यक्रमादरम्यान “गोपीनाथ मुंडे अमर रहे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा सोहळा केवळ पुतळा अनावरणाचा नसून, लोकनेत्याच्या विचारांना, कार्याला आणि स्मृतींना उजाळा देणारा भावनिक प्रसंग ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button