भाजप तिकीट वाटपावरून अमरावतीत असंतोष; ललित समदुरकर यांची नाराजी हस्तक्षेपानंतर दूर

अमरावती :
अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटप प्रक्रियेवरून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे वरिष्ठ नेते ललित समदुरकर यांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
ललित समदुरकर हे पात्र उमेदवार असतानाही त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या तिकीट वाटपामुळे भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता वाढली होती आणि याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटत होते.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला. त्यांनी ललित समदुरकर यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली. यावेळी पक्षाकडून भविष्यात त्यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
या मध्यस्थीनंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद कमी होऊन पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.



