तहसील पोलिसांची अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह तस्कर रंगेहात अटकेत

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हॉटेलजवळ एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तस्कराला तहसील पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिस कारवाईदरम्यान आरोपीकडून एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, आरोपीचा अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कशी संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, पोलिसांची ही मोहीम पुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले.



