अनैतिक संबंधांच्या संशयातून भाजी विक्रेत्याची हत्या

गळा आवळून खून; दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकला
धारणी
धारणी तहसीलमध्ये बेपत्ता असलेल्या भाजी विक्रेता चिंटू उर्फ मोहम्मद जुबेर अब्दुल जहूर (वय ३९) यांच्या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीने गळा आवळून खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
चिंटू उर्फ जुबेर हा धारणी येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये राहत होता. १९ डिसेंबर २०२५ रोजी तो मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. अखेर २१ डिसेंबर रोजी धारणी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्तेची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, २४ डिसेंबर रोजी धारणी–हरिसाल रस्त्यावरील उतावली शेतशिवारातील सुभाष मनवर यांच्या शेतातील विहिरीत सडलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. तपासादरम्यान मृतदेहाच्या कंबरेला व पाठीमागे जड दगड (दगडी जाटा) दोरीने बांधलेला आढळून आला. त्यामुळे हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
मृतकाचा भाऊ मोहम्मद रफी मोहम्मद जहूर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांच्याकडे सोपविण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी बुडा गंगाराम जांभेकर (वय ४९) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीला मृतक व त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून १९ डिसेंबर रोजी आरोपीने चिंटू उर्फ जुबेर याला आपल्या झोपडीवर बोलावून दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
आरोपीला अटक करून धारणी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास धारणी पोलीस करत आहेत.



