ग्रामीण भारतापुढील आव्हाने समजून घेणे काळाची गरज – जयदीप हर्डीकर … डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न

अमरावती : ग्रामीण भारत आज अनेक गंभीर आव्हानांचा सामना करीत आहे. जागतिकीकरण, आर्थिक विषमता, हवामान बदल ही आजच्या काळातील प्रामुख आव्हाने आहेत. ग्रामीण भागातील समस्यांवर आज अभ्यास करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी केवळ शासनच नव्हे, तर नागरिकांनी ही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, असे आवाहनात्मक प्रतिपादन अभ्यासक व मुक्त पत्रकार श्री जयदीप हर्डीकर यांनी केले. ‘ग्रामीण भारतातील सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयाची मांडणी करतांना ते बोलत होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था व नियमन केंद्र आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. जयवंत पुसदेकर, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे उपस्थित होते.
विषयाची मांडणी करतांना श्री जयदीप हर्डीकर म्हणाले, आजच्या प्रसारमाध्यमांवरील वादविवाद बघितले तर आपल्या देशासमोर कुठल्याच समस्या नाहीत असे दिसते. ग्रामीण भागातील प्रश्नांना योग्य कव्हरेज मिळत नाही, जोपर्यंत आपण ग्रामीण भागाला समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला देशाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक वारसा उमजणार नाही. शेतक-यांसमोर अनेक समस्या आहेत. तो कर्जबाजारी कां झाला, आत्महत्या का करीत आहे हे प्रश्न शासनासह जनतेने सुध्दा समजून घेतले पाहिजे. अमरावती व यवतमाळ जिल्हे सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यांनी कर्जबाजारी शेतक-यांच्या होणा-या दुरावस्थेचे उदाहरण देतांना चंद्रपूर जिल्ह्रातील शेतक-याला कर्ज फेडण्याकरिता किडणी विकावी लागल्याची ह्मदयकारक घटना सांगितली.
सध्या शहराचा खुप लाड चालला आहे. मेट्रो, चकचकीत रस्ते, स्वस्त भाजीपाला, फाईव्ह – जी, सुविधा यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविल्या जातात. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात आजही शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी व वीज आदी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विकासाची दुरी अधिक वाढत आहे. शेतकरी जगतात कसे, नवीन युवकांना शेती का करावीशी वाटत नाही. त्यांच्यात शेतीविषयी अनास्था निर्माण होत असल्यामुळे तो भाग अस्थिर होत असल्याचे ते म्हणाले.
भारतातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पण निसर्गाचे झालेले असंतुलन, हवामान बदल यामुळे देशात कधी दुष्काळ, तर कधी मोठ¬ा प्रमाणावर पाऊस यामुळे पिकांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. या वर्षी पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये शेती व पिके वाहून गेली. अऩेक अडचणींचा सामना शेतक-यांना करावा लागला. अनेक संकटे शेतक-यांवर कोसळली. शेतमालाला कमी भाव त्यामुळे शेतकरी अजून खचून गेला.
ग्रामीण भागातील जनता शहरी भागातील जीवनशैलीचे अऩुकरण करतांना त्यांच्या महत्वाकांक्षा सुध्दा बदलतात. एकीकडे जगाचा आर्थिक खेळ चालला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागाचा विकास मागे पडतांना दिसून येतो. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीतील उत्पन्नापेक्षा बिगर शेतीतील उत्पन्न अधिक असल्याचे दिसून येते. काही मोजक्याच लोकांकडे देशातील संपत्ती एकवटतांना दिसते. हे चित्र अर्बन व रुरल इंडियामध्ये मोठी विषमता निर्माण करित आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांचे पालकत्व शिक्षण क्षेत्राने स्वीकारले पाहिजे आणि नागरिकांनीही ग्रामीण भागातील सद्यस्थिती सुधारण्यासाठी आणि तेथील आव्हाने दूर करण्यासाठी जबाबदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.
शेतकरी आत्महत्यांंवर विद्यापीठ उपाययोजना सुचविणार – कुलगुरू
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते बोलतांना म्हणाले, यवतमाळ व अमरावती सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. शेतक-यांच्या उन्नतीसाठी शासनाने अनेक योजना राबविल्यात, पण आत्महत्या कमी होतांना दिसत नाहीत. आत्महत्यांसाठी ग्राऊंड स्तरावर असलेल्या मुद्यांवर विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था व नियमन केंद्राच्यावतीने तज्ज्ञांच्या समितीचे संशोधन सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विद्यापीठ ठोस उपाययोजना सूचविणार, त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील, असा वि·ाास कुलगुरूंनी याप्रसंगी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. जयवंत पुसदेकर यांनी केले.
सुरुवातीला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, स्वागतपर भाषण प्राचार्य अंबादास कुलट, संचालन डॉ. प्रवीण हरमकर, तर आभार डॉ. सुवर्णा गाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



