परतवाड्यात संताप उसळला; अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज दुरानी चौकात विराट हिंदू जनसभा

परतवाडा पुन्हा एकदा तापलं आहे. अचलपूर-परतवाडा परिसरात घडलेल्या संतापजनक अत्याचार प्रकरणानंतर आता जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरू लागला आहे. पीडितांना न्याय आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज परतवाड्यात विराट हिंदू जनसभा आयोजित करण्यात आली आहे.
आज सायंकाळी ५ वाजता पूर्वनियोजित जयस्तंभ चौकाऐवजी दुरानी चौक येथे या विराट जनसभेला सुरुवात होणार आहे. या सभेला राज्याचे मंत्री नितेश राणे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, श्रीराम सेनेचे अध्यक्ष सागर बेग, तसेच मीरा कळंबे यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
अचलपूर-परतवाड्यात घडलेल्या संतापजनक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी सकल हिंदू समाज आज मोठ्या संख्येने एकवटणार आहे.
या जनसभेत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई, पीडितांना तातडीने न्याय, तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक इशारा देण्याचा ठाम संदेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, सभेच्या ठिकाणी ९ कन्यांचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून महिला सन्मान आणि सुरक्षा या मुद्द्यांवरही भर दिला जाणार आहे.
परतवाडा आणि अचलपूर शहरात मागील काही दिवसांपासून विविध बैठका, नियोजन आणि जनसंपर्क मोहिमा राबवून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
परतवाड्यातील ही विराट जनसभा केवळ निषेधापुरती मर्यादित राहते की पुढील सामाजिक आणि राजकीय दिशा ठरवणारी ठरते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



