रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ताब्यात; ४ घरफोड्यांचा उलगडा, १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरात घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालत गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका सराईत घरफोड्या आरोपीला जेरबंद केले आहे. अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या आरोपीला ताब्यात घेत तब्बल ४ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्याच्याकडून १ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमरावती शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील घरफोडी गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाला ही महत्त्वाची यशस्वी कारवाई करता आली. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान समोर आले की, १० फेब्रुवारी २०२६ रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी आशीष उर्फ जंगली सावरीकर सागर (वय १९), रा. विलास नगर, संविधान चौक, अमरावती याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदर घरफोडीची कबुली दिली. चौकशी अधिक खोलवर नेल्यानंतर आरोपीने शहरातील आणखी ३ घरफोड्यांची कबुली दिली.
पोलिस तपासात आरोपीने अमरावती शहरातील एकूण ४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध बडनेरा आणि गाडगेनगर पोलीस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल असून, त्याने चोरलेली रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १,२२,७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपीचे नाव:
आशीष उर्फ जंगली सावरीकर सागर (वय १९)
रा. विलास नगर, संविधान चौक, अमरावती
आरोपीने कबूल केलेले गुन्हे:
- बडनेरा पोलीस ठाणे – अप.क्र. १०७/२०२६
- बडनेरा पोलीस ठाणे – अप.क्र. २६८/२०२६
- गाडगेनगर पोलीस ठाणे – अप.क्र. ३९०/२०२६
- गाडगेनगर पोलीस ठाणे – अप.क्र. ३६१/२०२६
या कारवाईमुळे अमरावती शहरातील घरफोडी प्रकरणांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आरोपीची अधिक चौकशी सुरू असून, आणखी काही घरफोड्यांचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त श्याम दुग्गे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बडाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.



