नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा थेट हल्ला!कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारात काही न्यायाधीन कैद्यांनी थेट कारागृह कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, कारागृहातील शिस्त आणि नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक १० परिसरात कैदी अभय तिवारी आणि शैलेश बेले यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी कारागृह कर्मचारी संदीप रमेश काळे (वय ४२) आणि अधिकारी संतोष मदने घटनास्थळी पोहोचले.
मात्र, परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काही कैद्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. आदर्श ऊर्फ पप्पी रमेश खरे, रजत राजा नांबे, भारत राजेंद्र पंडित आणि ऋषिकेश मनोज पेंडले या न्यायाधीन कैद्यांनी एकत्र येत कारागृह कर्मचारी संदीप काळे यांच्यावर हल्ला चढवला. कैद्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत संदीप काळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मागील काही दिवसांपासून कारागृहातील शिस्तभंगाच्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाचा कैद्यांवरील वचक कमी झाला आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर संबंधित कैद्यांवर कठोर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा, कारागृह व्यवस्थापन आणि अंतर्गत नियंत्रण यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती कठोर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



