बडनेऱ्यात ‘जनसेवा दिवस’चा भव्य उत्सव! आमदार रवि राणा यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम

अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा दिवस” मोठ्या उत्साहात आणि समाजाभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला. शंकर नगर परिसरात सकाळपासूनच नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. वाढदिवस केवळ उत्सव न ठेवता समाजसेवेचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत विविध जनहिताचे उपक्रम राबवण्यात आले.
आमदार रवि राणा आणि भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते विविध समाजोपयोगी साहित्याचे भव्य वाटप करण्यात आले. निराधार आणि परित्यक्ता महिलांना तब्बल ३०९ शिवण मशीन देऊन स्वावलंबनाचा मार्ग खुला करण्यात आला. बेरोजगार युवकांना २२ कटले आणि १८० लोटगाड्यांचे वितरण करण्यात आले, तर ४२ सलून किट देऊन लघुउद्योगांना चालना देण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रालाही विशेष प्रोत्साहन देण्यात आले. MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके देण्यात आली. १७ विद्यार्थ्यांना लॅपटॉप, तर शाळकरी मुलांना २५ सायकलींचे वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी १७ तीनचाकी सायकलींचे वितरण करण्यात आले.
सांस्कृतिक क्षेत्रालाही या उपक्रमातून बळ देण्यात आले. ५७ भजन मंडळांना भजन साहित्य आणि २२ साऊंड सिस्टीम देण्यात आल्या. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी १४ गावांमध्ये ओपन जिम आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले, तर ५७७ मुलांना बॅट-बॉलचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, भातकुली तालुक्यातील कानफोडी गावातील अपघातात मृत्यू झालेल्या नैतिक आणि समीक्षा साबळे यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यासोबतच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणाही आमदार रवि राणा यांनी केली.
कार्यक्रमादरम्यान आमदार रवि राणा यांच्या जीवनप्रवासावर आधारित विशेष टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर पाहताना नवनीत राणा भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बडनेऱ्यात साजरा झालेला “जनसेवा दिवस” हा केवळ वाढदिवसाचा उत्सव ठरला नाही, तर समाजसेवा, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारा उपक्रम ठरला. जनतेच्या सेवेसाठी वाढदिवस साजरा करण्याची ही वेगळी परंपरा बडनेऱ्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाली.



