agricultureLatest NewsLatur

लातूर जिल्ह्यात रबी हंगामाचा उत्साहवर्धक कल; पेरणी सरासरीपेक्षा अधिक

लातूर जिल्ह्यात रबी हंगामाला यंदा सकारात्मक दिशा मिळत असून सुरुवातीच्या अडचणींनंतरही पेरणीने सरासरीपेक्षा अधिक क्षेत्र व्यापले आहे. पावसातील अनियमिततेमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रबी पेरणी रखडली होती. काही भागात दुबार पेरणीची वेळही आली. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थिती बदलू लागली आणि पेरणीला गती मिळाली.

जिल्ह्याची रबीची सरासरी पेरणी ३ लाख १८ हजार ६८७ हेक्टर इतकी आहे. तर सध्या प्रत्यक्ष पेरणी ३ लाख ३५ हजार ८२१ हेक्टरपर्यंत पोहोचल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे रबी हंगामाने सरासरी ओलांडत सकारात्मक कल दर्शविला आहे.

या हंगामात हरभऱ्याच्या पेरणीत मोठी वाढ झाली आहे. हवामान अनुकूल असल्याने हरभरा पिकाची वाढ उत्तम असून उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आता कमी असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी सुरू राहण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

कृषी अधीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले की, उशिरा झालेल्या पेरणीचा उत्पादनावर नकारात्मक परिणाम होणार नाही. हरभरा, गहू आणि ज्वारी ही पिकं सध्या चांगल्या वाढीच्या टप्प्यात आहेत. थंडी वाढल्याने गव्हाच्या पेरणीला योग्य गती मिळत आहे.

काही ठिकाणी किडीचा आढळून आलेला प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. एकूणच हवामान पिकांच्या वाढीस पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये यंदाच्या रबी हंगामाबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button