Latest News

लातूर पोलीस ठाण्यात शिवीगाळ, मारहाण ! व्यावसायिक श्रीकर फड यांचे गंभीर आरोप

लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि महावितरणच्या मुख्य अभियंत्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांनी आज लातुरात पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला.
श्रीकर फड यांचा आरोप आहे की, त्यांच्या कमर्शियल जागेतील कालबाह्य विद्युत लाईन स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक रक्कमही भरली होती. मात्र, महावितरणचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत होते.
या संदर्भात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून फड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि अंबाजोगाई न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते. असे असतानाही महावितरणचे अधिकारी भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
श्रीकर फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी त्यांना कार्यालयात बोलावले होते. तेथे बुलबुले गैरहजर असताना, त्यांना जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
येथे पोलीस निरीक्षक समाधान चावरे आणि पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांनी आपल्याला एका सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली, असे फड यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत श्रीकर फड यांनी पोलीस अधिकारी समाधान चावरे यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओही पत्रकारांना दाखवला.
श्रीकर फड यांनी मागणी केली आहे की, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, पोलीस निरीक्षक समाधान चावरे, पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कठोर कार्यवाही करण्यात यावी.
या प्रकरणी त्यांनी मानवाधिकार आयोग, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक, लातूरचे पोलीस अधीक्षक आणि लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही रितसर तक्रार दाखल केली आहे. चावरे यांच्यासारख्या बोटांवर मोजण्याइतक्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात आहे, यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत फड यांनी व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button