Latest NewsMaharashtra

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणानुसार बियाण्यांमध्ये संशोधन आणि त्यांचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जागतिक स्तरावरील बी-बियाणे उद्योगाच्या ‘एशियन सीड काँग्रेस (एएससी) 2025’ चे आयोजन मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे-कुर्ला संकुल येथे करण्यात आले आहे. 17 तारखेपासून सुरू असलेल्या या परिषदेस पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रमुख अतिथी म्हणून भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, कृषी नवोन्मेष व बी-बियाणे उद्योग विकास क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहिला आहे. बदलत्या परिस्थितीनुसार संशोधित बियाणांची निर्मिती करणे आवश्यक असून यापुढेही राज्य शासन बियाणे उत्पादक कंपन्यांना सहकार्य करेल.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर उच्च प्रतीच्या संशोधित बियाणांचा वापर वाढणे आवश्यक आहे. बी-बियाणे उद्योगातील पारदर्शकता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासन महत्वपूर्ण पावले उचलत आहे. बनावट बियाणे रोखण्यासाठी कठोर दंडात्मक तरतुदी सारखे अनेक सुधारात्मक उपाय राबविले जात आहेत. चांगल्या आणि उच्च प्रतीच्या बियाणे उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहित करणे, शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणे, त्यातून राज्याची उत्पादकता वाढविणे, आधुनिक प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ आणि हमीभाव मिळवून देणे यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत असल्याचेही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी नमूद केले.

भारतात दहा वर्षानंतर ‘एशियन सीड्स काँग्रेस 2025’ होत असून यामध्ये देशातील शंभरहून अधिक बियाणे उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. बियाणे क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, उद्योग तज्ज्ञ, धोरण निर्माते व संशोधक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. नॅशनल सीड्स असोसिएशन ऑफ इंडिया (एनएसएआय), एशिया पॅसिफिक सीड्स अलायन्स (एपीएसएआय) आणि फेडरेशन ऑफ सीड्स इंडस्ट्री ऑफ इंडिया (एफएसएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button