Latest NewsNanded

नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बिबट्याची दहशत! शिखाची वाडी शिवारात आखाड्यावर बांधलेली शेळी केली फस्त

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावराने मोठी दहशत निर्माण केली आहे. शिखाची वाडी शिवारात बिबट्याने आखाड्यावर बांधलेली एक शेळी मध्यरात्री फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काय आहे नेमकी घटना?
मुदखेड तालुक्यातील शिखाची वाडी येथील दिगांबर अंबादास खानसोळे यांच्या आखाड्यावर बांधलेल्या एका पाळीव शेळीवर मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला आणि तिची शिकार केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते. तो धोका कमी होत नाही तोच आता पुन्हा मुदखेड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे.

वनविभागाकडून पंचनामा
या घटनेची माहिती मिळताच शेतकरी दिगांबर खानसोळे यांनी तात्काळ वन विभागाला कळवले. त्यानुसार वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.

शेतकरी खानसोळे यांनी वनविभागाकडे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे, तसेच नुकसानीपोटी शेळीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणीही केली आहे.

बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास आणि आपल्या पाळीव प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल चिंतेत आहेत. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button