दिल्ली स्फोट आणि जुबली हिल्स पोटनिवडणुकीमुळे हैदराबादमध्ये कडेकोट सुरक्षा

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून, हैदराबादमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
सायबराबादच्या आयटी हबपासून नामपल्ली रेल्वे स्टेशनपर्यंत पोलिस तपासणी सुरू असून, वाहनांची तपासणी, बॅगा स्कॅन करणे आणि नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, हैदराबादमध्ये सुरु असलेल्या जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान पोलिसांनी सुरक्षा आणखी कडक केली आहे. मतदानाची प्रक्रिया सकाळी ७ वाजता सुरू झाली असून, मतदान केंद्रांवर सशस्त्र दलांची वाढीव उपस्थिती दिसत आहे.
तेलंगणातील सर्व शहरांच्या पोलिस आयुक्तांना आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना ‘ब्लू कोल्ट्स’ पथके तसेच इतर फील्ड युनिट्स तैनात करून गस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात शांतता आणि सुरक्षेचे वातावरण कायम राखण्यासाठी पोलिस सतर्क आहेत.



