नांदेडजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : एकाच कुटुंबातील २ ठार, ८ गंभीर जखमी

नांदेड : हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात लातूर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या महामार्गावर रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू असताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी योग्य खबरदारी न घेतल्यामुळे आणि पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) उपलब्ध करून न दिल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी कोणताही सूचना फलक लावलेला नव्हता आणि वाहतूक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
अपघातात एक जेसीबी, दुरुस्तीचे साहित्य घेऊन जाणारे वाहन, नांदेडहून आर्णीकडे जाणारा आयशर ट्रक आणि चाकूरहून चंद्रपूरकडे जाणारी चारचाकी कार यांच्यात जबर धडक झाली. कारमधील सर्व प्रवासी लातूर येथील असून, सॉफ्टवेअर इंजिनिअर मनोज रामराव देवगुरे यांच्यासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी ते चंद्रपूरला जात होते. या अपघातात मनोज रामराव देवगुरे (३४) आणि मंजुषा देवदास आईलवार (३७) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात पियुष देविदास आईलवार (४२), मंजुषा निळकंठ असेवाढ (४०), रामराव देवगुरे (६०), प्रतिभा देवगुरे (५७), दत्तात्रेय अंकुटे (२५), निधी आसेवाड (१४), शरयू असेवाड (७) आणि आयशर वाहनचालक शाहरुख खान (३४, रा. खंडवा, मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी भेट देऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, महामार्गावरील कामाच्या वेळी सुरक्षितता राखण्यात आणि सूचनाफलक लावण्यात आलेली निष्काळजीपणा या अपघातास कारणीभूत ठरली.
या अपघातानंतर महामार्गावरील डागडुजीच्या कामातील अनागोंदी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुरक्षित वाहतूक आणि प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी रस्ते काम करताना सर्व नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.



