अमरावतीत कंत्राटदार महासंघाचा ठिय्या आंदोलन, दिवाळीपूर्वी थकबाकी द्या, नाहीतर आंदोलनाचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष प्रकल्प विभाग आणि विविध सरकारी खात्यांतर्गत करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे पैसे कंत्राटदारांना मिळालेले नाहीत. 2023-24 आणि 2024-25 मध्ये नगरविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर खात्यांची तब्बल हजारो कोटींची कामे, पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार-खासदारांच्या दबावाखाली करण्यात आली. मात्र आजपर्यंत कंत्राटदारांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून, काहींवर आत्महत्येची वेळ येत असल्याची भीषण परिस्थिती आहे. या गंभीर समस्येवर लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. “दिवाळीच्या आधी आमची बिले द्या” अशी ठाम मागणी आंदोलनादरम्यान कंत्राटदारांनी केली. त्यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष अश्विन पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
नगरविकास विभागाची तब्बल 400 कोटी रुपयांची
ग्रामविकास विभागाची 500 कोटी रुपयांची
सामाजिक न्याय विभागाची 100 कोटी रुपयांची
तर इतर विभागांची जवळपास 200 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत.
कंत्राटदार महासंघाने आजच्या आंदोलनानंतर इशारा दिला आहे की,
29 सप्टेंबर रोजी विशेष प्रकल्प विभाग अमरावती कार्यकारी अभियंता पिंजरकर यांच्या दालनात आंदोलन,
6 ऑक्टोबर रोजी अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता वानखडे यांच्या दालनात आंदोलन,
तर 13 ऑक्टोबर रोजी दर्यापूर विशेष प्रकल्प विभाग क्र. 2 कार्यकारी अभियंता अडसुळे यांच्या दालनात आंदोलन केले जाणार आहे.
कंत्राटदार महासंघाचे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, दिवाळीपूर्वी थकबाकी मिळाली नाही तर राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याची चेतावणी देण्यात आली आहे.



